मध्यवर्ती मुंबईत घरांचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे आपापल्या गरजा व अपेक्षांप्रमाणे ग्राहक मुंबईच्या उपनगरांमध्ये घर शोधतात.
ताज्या आकडेवारीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जानेवारी २०२३ मध्ये सर्वाधिक स्थावर मालमत्तांच्या विक्रीची नोंदणी ही पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये झाली आहे.
पश्चिम उपनगरांना ग्राहकांनी सर्वात जास्त पसंती दिली आहे. जानेवारी २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या मालमत्तांच्या एकूण नोंदणीपैकी ५८ टक्के ही पश्चिम उपनगरांत तर ३० टक्के नोंदणी ही पूर्व उपनगरांमध्ये झाली आहे. म्हणजेच मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांचा विक्री नोंदणीमधला एकूण हिस्सा हा एकूण ८८% झाला आहे.
मुंबईच्या उपनगरांना ग्राहकांकडून मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामागे मुख्य कारण मुंबई मधील चांगली कनेक्टिव्हिटी.
पश्चिम रेल्वे, मेट्रो सेवा, मध्य रेल्वे तसंच पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, एलबीएस मार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड अशा अनेक मार्गांनी मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांमधली तसंच मध्यवर्ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरांशी कनेक्टिव्हिटी चांगली विकसित झाली आहे.