इस्टेट प्लॅनिंग म्हणजे आपल्या संपत्तीचे व्यवस्थापन.
आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मदतीने प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करू शकतो. मालमत्ता ही स्थावर आणि जंगम अशी दोन प्रकारची असते. जमिनीशी संबंधित मालमत्ता ही स्थावर मालमत्ता प्रकारात मोडते. ह्यामध्ये घर, दुकान, कारखान्याची जागा, कार्यालय इत्यादी येते. स्थावर मालमत्ता ही इच्छापत्र, विभाजन किंवा गिफ्ट डीड शिवाय हस्तांतरित करता येत नाही.
जंगम मालमत्ता म्हणजे अशा मौल्यवान वस्तू ज्या इतरत्र हलवल्या जाऊ शकतात. जसे की हिरे, मोती, सोने, दागिने, घड्याळ, पैसे, लॅपटॉप इत्यादी. या प्रकारात मोडणारी मालमत्ता कुठलीही नोंदणी न करता सहज हस्तांतरित करता येते.
मालमत्ता वारसदारांच्या नावावर करून देण्याचा, त्याचे वाटप करण्याचा हक्क मालकाला असतो. ही एक कायदेशीर प्रक्रिया असते. त्यामुळेच त्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञ, कायद्याची माहिती असलेल्या व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे असते.
आपला वारस हक्क पुढच्या पिढीकडे देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मालमत्ता संरक्षण आणि मालमत्ता वाढविणे. मालमत्ता ही एका पिढीकडून पुढील पिढीकडे दिलेला अनमोल ठेवा असतो.
अस्तित्वात असलेली स्थावर मालमत्ता जसे की घर, दुकान, गाळा वगैरे विकून दुसरी मालमत्ता विकत घेणे, त्यातून फायदा कमावणे, या प्रकारचे व्यवहार सतत करत राहणे, नवे घर किंवा दुकान विकत घेणे, गुंतवणूक म्हणून मालमत्तांची खरेदी-विक्री करणे यांचाही समावेश मालमत्ता व्यवस्थापनात येतो.
इस्टेट प्लॅनिंग ही एक दिवसात होणारी प्रक्रिया नाही. योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य व्यक्तीच्या सल्ल्याची गरज असते. ही सेवा अतिशय उच्च श्रेणीत येते. कारण मालमत्ता व्यवस्थापन आणि कायदेशीर पैलूंची जाण असणारी व्यक्तीच ही सेवा देऊ शकते.
इस्टेट प्लॅनिंगचे प्रमुख उद्देश -
● वारसदार किंवा इतर लाभार्थी व्यक्तींमध्ये मालमत्तेचे हस्तांतरण करणे.
● मालमत्ता नियोजन करून कर व्यवस्थापन करणे.
● स्वतःच्या हयातीत योग्य उत्तराधिकारी निवडणे.
● कायदेशीर रीत्या योग्य अटी घालून संपत्ती पुढील पिढीकडे सोपविणे. म्हणजेच संपत्ती कोणाला आणि कधी मिळावी; ह्याबाबत स्पष्टता येणे.
कमर्शिअल प्रॉपर्टी मधून भविष्यात देखील पैशाचा ओघ चालू राहतो. ज्याला फ्यूचर कॅश फ्लो मध्ये म्हटले जाते. ह्या अखंड पैशाच्या ओघातून देखील संपत्ती निर्माण होणारी योजना करता येते. त्यासाठी फायनान्शियल प्लॅनरला भेटणे अतिशय गरजेचे असते. तुम्ही जे संपत्ती स्वरूपात झाड मोठं केले आहे; त्याच्या संरक्षणासाठी आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतल्यास पुढील अनेक पिढ्यांचे भले होते.