पर्सनल फायनान्स म्हणजे स्वतःच्या पैशाचे (मिळकतीचे) व्यवस्थापन करणे. बहुतांश लोकांकडून तुम्ही एक तक्रार ऐकली असेल; कितीही काटकसर केली तरीही महिन्याचे बजेट कोलमडते.
दरवर्षी देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना सर्वसामान्य व्यक्तीची नजर करबचत आणि इतर तरतुदींवर असते. कारण दरवर्षी वाढत जाणारी महागाई कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना अडथळा निर्माण करत असते. ह्या परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पर्सनल फायनान्स समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
एक सर्वात सोपी पद्धत आपल्या सोबत शेअर करत आहोत. एक रिकामा कागद घ्या; तो कागद दोन वेळा दुमडा (फोल्ड करावा), त्या कागदाच्या चार भागात खाली नमूद केलेल्या मुद्द्यावर लिहावे -
- आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग
- आपले पैसे खर्च होण्याची कारणे
- आपल्याला पैसे मिळण्याचे (भविष्यातील) संभाव्य मार्ग
(उदाहरण- आपली विविध गुंतवणूक योजनांबाबत अभ्यास करण्याची आवड भविष्यात आपला व्यवसाय होऊ शकतो.)
- आपला तोटा होण्याची संभाव्य कारणे
(उदाहरण- आरोग्य विमा नसल्यास आजरपणात पैसे खर्च होऊ शकतात)
(महत्वाची टीप - वर नमूद केलेले चार मुद्दे आपली आर्थिक कुंडली समजावी. आणि त्यात दर सहा महिन्यांनी नवीन कारणे/संधी/उपाय लिहावेत.)
जेणेकरून आपल्याला स्वतःच्या पैशाचा स्रोत (पैसे येण्याचे मार्ग) आणि पैसे खर्च होण्याची संभाव्य कारणे समजून येतील. ह्यालाच म्हणतात स्वतःच्या पैशाचे व्यवस्थापन करणे.
पर्सनल फायनान्स ही एक कला आहे. ज्यामध्ये तुम्ही बचत केलेल्या पैशाचे व्यवस्थापन करता. म्हणजेच येणाऱ्या पैशाचे नियोजन आणि खर्च होणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवता.
आपले आर्थिक उत्पन्न आणि पैशाच्या बचतीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या जाणकार बनणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला (संभाव्य) पैसे कमविण्याची संधी आणि पैसे खर्च होऊ शकणारे संभाव्य धोके देखील लक्षात येऊ लागतील.
थोडक्यात, स्वतःच्या पैशाचे व्यवस्थापन करताना विमा, गुंतवणूक पर्याय, कर नियोजन आणि इस्टेट नियोजन ह्या पैलूंचा विचार नेहमी करावा लागतो. जेणेकरून पैशाचे स्रोत वाढवून आपल्या पूर्ण कुटुंबाला आर्थिक संरक्षण देता येते.