निवृत्ती आणि प्लॅनिंग
निवृत्ती हा शब्द ऐकला तरी अनेकांना दचकायला होतं. तरुणपणी असं वाटतं की अजून खूप वेळ आहे, कशाला
निवृत्तीचा विचार करायचा? चाळीशी येते तेंव्हा कर्तव्यांची रांग लागलेली असते आणि कमाईतून बचत करु की
खर्च करु असा तिढा समोर येतो. आणि पन्नाशी उलटते तेंव्हा असं वाटतं की आता वेळ निघून गेलेली आहे.
प्रत्यक्षात दोनच गोष्टी खऱ्या आहेत. एक म्हणजे नोकरी लागल्याच्या पहिल्याच टप्प्यात निवृत्तीनंतरचा विचार
केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे प्लॅनिंगच्या बाबतीत कोणत्याही वयात विचार केला तरी तो फायद्चाच ठरतो.
‘जब जागो, तब सवेरा’ ही म्हण याबाबतीत अक्षरशः खरी आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे माणसाचे आयुष्य
वाढले आहे, हे वाढलेले आयुष्य सूसह्य करायचे असेल तर नियोजन हाच एकमेव प्रभावी मंत्र आहे.
पण नियोजन म्हणजे काय? तर या प्रश्नाचे एका ओळीत उत्तर द्यायचे तर ते आहे,
आयुष्याला आर्थिक शिस्त लावणे. आपले उत्पन्न, मासिक खर्च, गुंतवणूकीची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या
विविध मार्गांचा विचार करणे. थोडक्यात तुमच्या इन्कमचे व्यवस्थापन करणे. कोटुंबिक जबाबदाऱ्या फार
नसतानाच याचा विचार केला गेला तर अर्थातच उत्तम आहे, मात्र वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही हे सुरु करु
शकता. वक्त पर आये या देरसे आये, दुरुस्तही आते है. मात्र प्रत्येक टप्प्यात गुंतवणुकीचा विचार वेगळ्या
पद्धतीने करावा लागतो.
सेवानिवृत्तीचे नियोजन उशिरा सुरू केल्यास मोठ्या रिटायर्डमेंट कॉर्पसची शक्यता थोडी कमी होते आणि लवकर
सुरू केले तर असा मोठा कॉर्पस जमा करण्यासाठी भरपूर वेळ हाती राहतो. गुंतवणुकीसाठी अधिक वर्षे असतील
तर कमी रकमेचे योगदान देऊनही मोठा कॉर्पस तयार केला जाऊ शकतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत
गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध आहेत. योग्य वेळेची वाट पाहत अनेक जण गाफील राहतात आणि प्लॅनिंग लांबवत
राहतात.
वर्तमानातील खर्चाचा अंदाज घेऊन भविष्यातील खर्चाचा ढोबळ अंदाज बांधता येतो. भविष्यातील सांसारिक
जबाबदाऱ्यांचा आणि खर्चाचाही साधारण अंदाज बांधता येतो. एरवी भविष्य सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज
भासते मात्र गुंतवणुकीचे आणि बचतीचे भविष्य ज्याचे त्याला स्वतःच कळु शकते. आपली कर्तव्ये आणि
सेवानिवृत्तीनंतरच्या वर्षांत आपली आधीचीच जीवनशैली टिकवून ठेवायची असेल तर असे नियोजन अत्यंत
महत्त्वाचे ठरते. हे सर्व साध्य करण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यांचा उपयोग योग्य प्रकारे करता आला तर
आयुष्य आरामात जगता येते.