इन्शुरन्स


pageheaderimg


वैयक्तिक धोका व्यवस्थापन

 

प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनात अनेक धोक्यांना सामोरे जात असतो. बरेचसे धोके हे टाळता येण्याजोगे नसतात. पण योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास आयुष्यातील बरेच धोके/कष्ट दूर होतात.

वैयक्तिक जीवनात येणाऱ्या धोक्यांच्या विचार केल्यास त्याचे वर्गीकरण प्रमुख तीन भागात होते; ते पुढीलप्रमाणे -

 

१) आजारपण, दुखापत आणि अकाली मृत्यू

२) व्यवसायातील नुकसान किंवा आर्थिक उत्पन्न स्रोत कमी होणे

३) मालमत्तेचे नुकसान

 

सर्वसाधारणपणे माणसाच्या आयुष्यातील बरेचसे धोके हे त्याच्या रोजच्या सवयी आणि कामाचे स्वरूप ह्यावर देखिल अवलंबून असतात. उदाहरणार्थ - रोज गोड पदार्थ अती प्रमाणात खाणे किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याची सवय माणसाला आजारपण व मृत्युला सामोरे नेतात.

त्याचप्रमाणे माणसाचे कामाचे स्वरूप विविध धोक्याची शक्यता निर्माण करते.

 

उदाहरण १ - जर व्यक्तीचे काम फिरती स्वरूपाचे असल्यास अपघात होण्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो.

 

उदाहरण २ - इलेक्ट्रिशियन असणाऱ्या व्यक्तीस

शॉक लागून दुखापत किंवा मृत्युची शक्यता ही इतरांच्या तुलनेत जास्त असते.

 

माणसाच्या आयुष्यात येणारे वाईट प्रसंग सांगून येत नाहीत. पण संभाव्य शक्यतांचा विचार केल्यास बरेचसे धोके किंवा होणारे आर्थिक नुकसान कमी करता येऊ शकते. म्हणूनच धोक्यांचे व्यवस्थापन करण्याची कार्यप्रणाली  टप्प्याटप्प्याने पाहू. जेणेकरून प्रत्येकाला त्याचा अवलंब करता येईल.

 

वैयक्तीक धोका व्यवस्थापन कार्यप्रक्रिया -

 

१) धोक्याचे विश्लेषण (Risk Analysis) -

 

धोका व्यवस्थापन कार्यप्रक्रियेतील 'धोका विश्लेषण' हे पहिले पाऊल आहे. ह्या टप्प्यात धोका ओळखणे (Risk Identification) आणि धोका मुल्यमापन (Risk Evaluation) ही दोन कार्ये अंतर्भूत आहेत.

 

अ) धोका ओळखण (Risk Identification) -

प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात कोणते धोके संभावतात हे ओळखता आले पाहिजे. वैयक्तिक जीवनातील धोका व्यवस्थापन कार्य प्रक्रियेतील हा महत्वाचा टप्पा आहे.

 

सर्वसाधारणपणे, खाली नमुद केलेले धोके माणसाच्या आयुष्यात येऊ शकतात.

 

१) अशी प्रत्येक घटना/बदल जी व्यक्तीच्या आयुष्यात आल्यास -

  • शारीरिक आणि मानसिक हानी पोहोचेल
  • आर्थिक उत्पन्नात घट होईल
  • मालमत्तेचे मूल्य कमी होईल

 

२) अशी कोणतीही घटना जी भविष्यातील योजना उधळून लावेल.

(उदाहरण- कुटुंबातील एका व्यक्तीच्या गंभीर आजारपणात जमवलेले पैसे खर्च झाल्यामुळे मुलांना हवं असलेले उच्च शिक्षण देण्यास असमर्थता येणे)

 

३) अशी कुठलीही घटना किंवा बदल जी व्यक्तीच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सुद्धा त्रासदायक होईल.

(उदाहरण- पावसाळ्यात घरातील भिंतींना ओलावा धरणे)

 

वर नमूद केलेल्या धोक्यांचे वर्गीकरण माणसाला त्याच्या जीवनातील वास्तविक गरजांची ओळख करुन देतात. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी योग्य नियोजन करता येईल.

 

ब) धोक्याचे मुल्यमापन करणे (Risk Evaluation) -

 

धोक्याचे मुल्यमापन करण्यासाठी सर्व संभाव्य धोके

संभाव्य शक्यते नुसार (तीव्रतेनुसार) एका क्रमात मांडणे आवश्यक असते. म्हणजेच चेकलिस्ट पद्धतीचा वापर करणे. त्यामुळे धोक्यांचे मुल्यमापन करणे शक्य होते.

 

उदाहरण -

  • पावसाळ्यात घराला पाण्यापासून धोका असल्यास घर दुरूस्तीचे काम करणे.
  • घरातच स्त्रीधन ठेवत असल्यास बँक लॉकर घेणे.
  • वैयक्तिक गरजांसाठी घेतलेल्या कर्जाची परत फेड शक्य तितक्या लवकर करणे.
  • मासिक उत्पन्न कमी-अधिक होत असल्यास योग्य नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसाय द्वारे पक्का उत्पन्न स्रोत तयार करणे.

 

 

२) धोका हाताळणे -

 

तीव्रतेनुसार धोक्यांचा क्रम निश्चित केल्यावर (मुल्यमापन केल्यावर) त्याची तीव्रता आणि शक्यता ह्याबाबत कल्पना येते. प्रत्येक माणसाला वैयक्तिक धोक्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कारण धोका हाताळण्याची योग्य पद्धत त्यातूनच ठरविता येते.

 

धोका हाताळण्याच्या पद्धती -

 

* धोकेदायक घटना/कृती टाळणे

* धोका कमी करण्याच्या दृष्टीने व्यवस्था करणे

* संभाव्य धोके हस्तांतरित करणे (विमा संरक्षण)

* धोक्याला योग्य साधनांनी आळा घालणे

* धोक्यामुळे होणारे आर्थिक नुकसान किंवा निर्माण होणारा खर्च पेलण्यासाठी स्वत:चा फंड तयार करणे

* वैयक्तिक पातळीवर निरीक्षण करुन भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्यांचा आढावा घेणे

 

३) संभाव्य धोका संदर्भात पैशाची व्यवस्था -

 

धोका व्यवस्थापनात पैशाची गरज असते. कारण धोके कमी करण्यासाठी व इतर उपाययोजना करण्यासाठी पैसा लागतो. आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास

धोक्यामुळे होणारी नुकसानी निश्चित स्वरूपात नसल्यामुळे पैशाची व्यवस्था एकाच वेळी करणे अवघड असते. त्यामुळे संभाव्य धोक्यातून होऊ शकणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेऊन दरवर्षी ठराविक रक्कम बाजुला काढावी.

 

आर्थिक जोखीम/धोका म्हणजे जमवलेले पैसे खर्च होणे; इतकाच मर्यादित नाही. आयुष्यातील एका टप्प्यावर आपण दरमहा पैसे (उत्पन्न)

मिळविण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम राहत नाही. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने भविष्य उदरनिर्वाह निधीची सोय करणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

पण प्रत्येक धोक्याला/जोखिमेला स्वतः जमवलेल्या पैशाने तोंड देता येत नाही. काही धोके/जोखीम विमा संरक्षण घेऊन संरक्षित करता येतात.

उदाहरण -

  • क्रिटिकल इलनेस पॉलिसी द्वारे गंभीर आजार खर्च विमा कंपनीकडून घेता येतात.
  • घर आणि दुकानाचे विमा संरक्षण घेणे.

 

 

४) धोका नियंत्रण

 

संभाव्य धोके व्यक्तीच्या जीवनात येऊ नयेत किंवा धोके नियंत्रित करणे हा (वैयक्तिक) धोका व्यवस्थापन प्रक्रियेचा मूळ उद्देश असतो.

 

जेव्हा व्यक्ती येणाऱ्या धोक्यांचा आढावा घेऊन त्याचे मुल्यमापन करतो, तेव्हाच तो आपल्या भांडवलाची वृद्धी करु शकतो. धोका व्यवस्थापन पद्धतीने व्यक्ती १००% कुठलाच धोका नियंत्रित करु शकत नाही. पण ह्या पद्धतीने व्यक्ती किमान ५०% धोके नियंत्रित करुन आपले शारीरिक व मानसिक आरोग्य निश्चितपणे चांगले राखू शकतो.

 

महत्वाची टीप -

 

वैयक्तिक धोका व्यवस्थापन प्रक्रिया उत्तमरीत्या अंमल करण्यासाठी खालील नमूद केलेल्या गोष्टींचा नक्की अंमल करावा.

  • मासिक खर्च हिशोब वहीत लिहावा. जेणेकरून दरवर्षी वाढत असणाऱ्या खर्चांचा अंदाज येतो.
  • आवश्यक माहिती स्वतंत्र नोंद वहीत लिहून ठेवावी. उदाहरण- बँक लॉकर नंबर
  • आपल्या क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांच्या संपर्कात रहावे. त्यामुळे आपल्या व्यवसायात किंवा कामात पकड मजबूत होते. आणि भविष्यात येऊ शकणारे संभाव्य बदल लक्षात येतात.
  • वर्षातून एकदा तरी वैचारिक विकास किंवा आवश्यक कौशल्य विकास करणाऱ्या शिबिरात जावे.

 

थोडक्यात, वैयक्तिक जीवनात येऊ शकणारे धोके नियंत्रित करण्याची कला आत्मसात केल्यास आपल्या कुटुंबाचा राहणीमान स्तर उंचावतो.

जोखीम/धोका हाताळण्याच्या विविध पद्धती-

धोके हे विविध प्रकारचे असतात. काही धोके पूर्णपणे टाळता येतात. पण बरेचसे धोके हे टाळता येत नाहीत. पण त्याची तीव्रता विविध पद्धतींचा अवलंब करून कमी करता येते.

 

१) टाळणे / प्रतिबंध - (Avoidance)

धोका टाळण्यासाठी पूर्व नियोजनाची गरज असते. ज्या गोष्टीमुळे किंवा घडामोडीमुळे धोका वाढतो, त्या गोष्टी पूर्णपणे थांबविल्यास धोका टाळता येतो. एखादी क्रिया दुसऱ्या पद्धतीने केल्यावर सुद्धा धोका टाळता येतो.

 

उदाहरण - कामगारांचा पगार चेक स्वरूपात किंवा बँक खात्यात जमा केल्यास बऱ्याच प्रकारचे धोके टाळता येतात.

उदाहरण - घर किंवा दुकान उंच ठिकाणी घेतल्यास पावसाळ्यात निर्माण होणारे बरेच धोके टाळता येऊ शकतात.

 

प्रत्येक धोका हा पूर्णपणे टाळता येत नाही. पण धोक्याला सामोरे जाऊन नुकसानीला तोंड देण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायाने धोक्यापासून लांब राहण्याची

पद्धत फायदेशीर ठरते.

 

२) धोके कमी करणे (Risk Reduction)

 

धोके कमी करणे म्हणजेच नुकसान किंवा धोका निर्माण करणाऱ्या शक्यता कमी करणे. वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीच्या शक्यता ह्या धोका निर्माण करतात. कुठल्याही प्रकारचे धोके पूर्णपणे घालवून टाकता येत नाहीत. पण त्याची शक्यता कमी करता येऊ शकते. योग्य प्रकारच्या नियोजनाने संभाव्य धोके व धोका निर्माण करणाऱ्या शक्यतांची तीव्रता कमी करता येते.

 

उदाहरण - घर, दुकान किंवा कंपनीमध्ये पाण्याची फवारणी (Sprinkler) करणारी प्रणाली बसवून घेतल्यास आग लागणे व आगीपासून मालमत्तेच्या नुकसानीचा धोका कमी होतो.

 

 

३) निर्माण होणारी आर्थिक नुकसानीची जबाबदारी स्वतः घेणे - धोका हाताळण्याची ही स्वतंत्र पद्धत आहे. आर्थिक नुकसानी लहान स्वरूपात असल्यास ही पद्धत शक्य आहे. बऱ्याचदा, व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा व्यावसायिक आयुष्यात आलेल्या नुकसानीला स्वतः सामोरे जातो. म्हणजेच भविष्यात होऊ शकणाऱ्या आर्थिक नुकसानीला तोंड देण्यासाठी स्वतःचा स्वतंत्र फंड तयार करतो.

 

४) संभाव्य धोके हस्तांतरित करणे (Transfer of Risk)

 

ज्या कृती किंवा घटना किंवा शक्यता ह्या धोका निर्माण करणाऱ्या असतात त्यांना दुसऱ्याकडे हस्तांतरीत करणे.

 

उदाहरण - मेडिक्लेम इन्शुरन्स द्वारे भविष्यात येऊ शकणारा आजारपणाचा खर्च विमा कंपनी देते.

 

विमा कंपनी वेगवेगळ्या स्वरूपाचे धोके विविध विमा योजनांनी संरक्षित करते. त्यामुळे धोक्याचे स्वरुप जाणून कुठलीही व्यक्ती हवे असलेले विमा संरक्षण घेऊ शकते.

 

 

५) धोक्यास आळा घालणे/प्रतिबंध घालणे -

 

काही वस्तुंच्या किंमतीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलाप्रमाणे चढ-उतार होत असतो. ह्याचा सर्वात जास्त धोका व्यावसायिकांना असतो. आजच्या संगणकीकृत काळात, परदेशात माल विकताना किंवा परदेशी माल विकत घेताना परकीय चलनाचा वापर होतो. परकीय चलन बाजार २४ तास चालू असते. आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार प्रत्येक देशातील चलनाचा भाव सुद्धा वर-खाली होत असतो. अशा प्रकारच्या धोक्यास आळा घालण्यासाठी (प्रतिबंध करण्यासाठी) व्यावसायिक 'हेज' (Hedge) पद्धतीचा उपयोग करतात. म्हणजेच दुसऱ्या देशाचा चलन भाव निश्चित करून खरेदीभाव किंवा विक्रीभाव निश्चित करतात. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या व्यवहाराची आणि व्यवहार मूल्याची निश्चिती करता येते.

 

६) संशोधन/संशोधनात्मक पद्धतीचा वापर -

 

सतत एकाच क्षेत्रात काम केल्यावर काही व्यक्तींना/कंपन्यांना भविष्यातील धोक्याची चाहूल लागते. अशा व्यक्ती/कंपनी भविष्यात होणाऱ्या संभाव्य घडामोडींचा विचार करून वर्तमानात स्वतःला सक्षम बनविण्याचा प्रयत्न करतात.

 

व्यावसायिक जगात प्रत्येक कंपनी आपल्या संशोधन विभागावर (Research Department) करोडो रुपये खर्च करते. कारण त्यांना भविष्याचा वेध घ्यायचा असतो.

 

उदाहरण- ग्राहकांचा कल शीत पेयापासून कमी होऊन आरोग्यास पौष्टीक पेयाकडे (Health Drink) वाढत चालला आहे. ग्राहकाच्या ह्या मागणीचा वेध घेऊन शीतपेय बनविणाऱ्या कंपन्यांनी आरोग्यास उत्तम असणारी पेय बनविण्यास सुरुवात केली आहे.

जोखीम वर्गीकरण / धोका वर्गीकरण

 

अ) आर्थिक जोखीम आणि विना-आर्थिक जोखीम

(Financial Risk & Non Financial Risk) -

 

ज्या जोखिमेचा / धोक्याचा संबंध आर्थिक नुकसानी बरोबर असतो. त्या जोखिमेला 'आर्थिक जोखीम' असे म्हणतात. आर्थिक जोखिमेला प्रत्येक व्यक्ती आणि कंपन्या वेळोवेळी सामोऱ्या जात असतात.

 

आर्थिक नुकसानी व्यतिरिक्त इतर नुकसानीची शक्यता निर्माण करणाऱ्या जोखिमांना 'विना-आर्थिक जोखीम' असे म्हणतात.

उदाहरणार्थ- कंपनीतील नविन कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीचे आवाहन.

 

ब) स्थिर जोखीम आणि गतीशील जोखीम

    (Static Risk of Dynamic Risk) -

 

कुठल्याही परिस्थितीतील बदलामुळे नुकसान न होता; एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीच्या घातक कृतीमुळे (चोरी किंवा अप्रामाणिकपणा) निर्माण होणाऱ्या नुकसानीच्या शक्यतांना 'स्थिर जोखीम' असे म्हणतात.

स्थिर जोखीम ही व्यक्ती समुहाला धोकादायक नसते. ही जोखिम योग्य व्यवस्थापन द्वारे कमी करता येते.

 

'गतीशील जोखीम' ही परिस्थितीनुसार निर्माण होणारी जोखीम आहे. उदाहरणार्थ, देशाच्या आर्थिक धोरणात योग्य बदल न झाल्यास बऱ्याच व्यक्तींना (समुहाला) एकत्रितपणे नुकसानीची झळ सोसावी लागते. ह्या जोखिमेचा आधीपासून अंदाज घेता येत नाही.

 

क) मूलभूत जोखीम आणि विशिष्ट जोखीम

(Fundamental Risk and particular Risk)-

 

मूलभूत जोखीम ही एकाच वेळी बऱ्याच व्यक्तींना (व्यक्ती समुहाला) नुकसान पोहचवते. ही जोखीम मुख्यतः आर्थिक वातावरणातील बदल, राजकीय सत्तेमधील बदल इत्यादीमुळे निर्माण होते. मूलभूत जोखीम बऱ्याच व्यक्तींवर एकसाथ विपरीत परिणाम करते.

उदाहरण - बेरोजगारी, युद्ध इत्यादी.

 

'विशिष्ट जोखीम' ही एकाच व्यक्तीस त्रासदायक ठरते. उदाहरण - व्यक्तीचे सामान चोरीला जाणे. ही जोखिम विमा संरक्षणाद्वारे हाताळता येऊ शकते.

 

ड) स्पष्ट जोखीम आणि अव्यवहार्य जोखीम

(Pure Risk of Speculative Risk) -

ज्या परिस्थितीत नुकसानीची शक्यता असते किंवा नुकसान न होण्याची शक्यता असते, अशा जोखिमेला 'स्पष्ट जोखीम' असे म्हणतात.

उदाहरण- वाहन विमा (विमा संरक्षित धोक्यामुळे वाहनाचे नुकसान झाल्यास वाहन विमाधारकाला नुकसान भरपाई मिळते)

 

एखादा धोका स्विकारल्यास नुकसान किंवा फायदा होण्याची शक्यता असल्यास त्याला 'अव्यवहार्य जोखिम' असे म्हणतात. ही जोखिम विमा संरक्षित होत नाही. उदाहरण - शेअर बाजारात इंट्रा-डे ट्रेडिंग करणे.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen