एस.आय.पी. हा शब्द जरी उच्चारला तरी म्युच्युअल फंड गुंतवणूक बाबत बोलत असल्याची जाणीव होते. येथे 'जाणीव' ह्या शब्दाचा उल्लेख मुद्दाम केला आहे. कारण प्रत्येक गोष्ट जाणिवेतून निर्माण होते. बिहेवियरल फायनान्स मध्ये व्यक्ती स्वभाव आणि गुंतवणूक बाबत शास्त्रोक्त मांडणी केली आहे. कुठलीही व्यक्ती स्वतःच्या स्वभावाच्या विरोधात जाऊन कुठलीही कृती करत नाही. गुंतवणूक बाबत देखील हेच सूत्र आहे. आपली आर्थिक गरज आणि आपल्या स्वभावानुसार गुंतवणूक पर्याय निवडणे; ह्यालाच स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणतात.
म्युच्युअल फंड एस.आय.पी. म्हणजे दरमहा निश्चित रकमेची गुंतवणूक म्युच्युअल फंड योजनेत करणे.
सर्वसाधारणपणे ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली जाते. पण एस.आय.पी. पद्धतीने पैशाची गुंतवणूक करण्यापूर्वी ध्येय निश्चित असले पाहिजे. कारण गुंतवणूक करण्यामागे हेतू स्पष्ट नसल्यास दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची जिद्द मनात राहत नाही.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा डेटा पाहिल्यास दिसून येते की, ९० टक्के गुंतवणूकदार ५ वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक करत नाहीत. ह्याचे मुख्य कारण गुंतवणूक करण्यामागील ध्येय निश्चित नसते. ही चूक आपल्याकडून होऊ नये; म्हणूनच ही माहिती आपल्याला देत आहोत.
म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि ध्येय निश्चित करण्याची प्रक्रिया -
१. स्वतःचे वय आणि दरमहा उत्पन्न लिहावे. पुढील पाच-दहा वर्षात (मनातील इच्छेनुसार) स्वतःचा आर्थिक स्तर लिहावा.
२. पैसे जमा करण्याचे उद्दिष्टे (मोटिव्ह) लिहावे.
(उदाहरण-मुलांचे उच्च शिक्षण)
३. या उद्दिष्टांचे स्मार्ट ध्येयांमध्ये रूपांतर करावे
४. ध्येय पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक नियोजन तयार करावे.
५. हे ध्येय पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी स्वतः निश्चित करावा.
६. ध्येय पूर्तीसाठी लागणाऱ्या पैशासाठी निवडलेल्या गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक सुरू करावी.
* महत्वाची टीप - गुंतवणूक करताना सातत्य राखावे. आणि गुंतवणूक योजनेचा परतावा दरवर्षी किंवा ठराविक कालावधीत नियमितपणे तपासावा.
म्युच्युअल फंड मधील अल्प व मध्यम अवधीसाठी गुंतवणूक
म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक (एस.आय.पी. द्वारे) अल्प (१ ते ३ वर्ष) किंवा मध्यम (३ ते ५ वर्ष) कालावधीसाठी करायची असल्यास डेट योजनेमध्ये करावी. डेट फंड हे निश्चित परतावा देणाऱ्या कर्जरोखे मध्ये पैशाची गुंतवणूक करतात. त्यामुळे बँक मुदत ठेवी हुन अधिक परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते.
थोडक्यात, कुठलाही अनुभव नसताना थेट शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. हा धोका न स्वीकारता म्युच्युअल फंड गुंतवणूक द्वारे शेअर बाजारातील संभाव्य परतावा मिळू शकतो.
म्युच्युअल फंड कंपनीने नियुक्त केलेले गुंतवणूक अभ्यासक (फंडामेंटल आणि टेक्निकल टीम) योग्य पद्धतीने लोकांच्या पैशाची गुंतवणूक इक्विटी आणि डेट (रोखे आणि कर्जरोखे) मध्ये करतात. त्यामुळे म्युच्युअल फंड युनिट्स धारकांना
दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीतुन मोठे भांडवल उभे राहते. भविष्यात त्याचा उपयोग ध्येय पूर्तीसाठी निश्चित होतो.
शेअर बाजार गुंतवणूक शिकण्याचे ध्येय बऱ्याच व्यक्तींचे असते. त्यांच्यासाठी देखील एस.आय.पी. पद्धत कामी येते.
शेअर बाजारातील थेट गुंतवणूक करताना एस.आय.पी. पद्धत म्हणजेच सरासरी पद्धत वापरून शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. ह्याबाबत दिशादर्शक म्हणून एक उदाहरण देत आहोत.
आपल्याला तर माहीतच आहे; बँकिंग क्षेत्रातील अनेक सरकारी आणि खाजगी बँक, स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड आहेत. त्यातील सेंसेक्स आणि निफ्टी मध्ये सहभागी बँक ची निवड करून दर महिन्याला दोन-पाच-दहा शेअर्स घेत रहावे. आपला मुख्य उद्देश सरासरी पद्धत वापरून आपल्या शेअर्सचा खरीद भाव हा मार्केट भाव पेक्षा कमी असण्याकडे ठेवावा. जेणेकरून तुम्हाला शेअर्स मध्ये थेट गुंतवणूक करून आनंद मिळेल. आणि आर्थिक फायदा घेत असताना गुंतवणूक धडे शिकता येतील.