सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्तीसाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. पण हे सर्व पर्याय सर्वांसाठी नसतात. कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. कुणी कुठे आणि कशात गुंतवणूक करावी याबाबतचे आकलन म्हणजेच गुंतवणूकदाराचे व्यक्तिमत्त्व.
एखाद्या व्यक्तीचं इन्कम, त्याचा खर्च, त्याच्या कौटुंबिक गरजा, त्याची कर्तव्ये, त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या हे सगळं पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं.
डॉक्टर कधी स्वतःच्या प्रकृतीची तपासणी स्वतः करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण स्वतः गुंतवणूक पर्याय निवडण्याचा प्रयत्न करत वेळ वाया घालविण्यापेक्षा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक केल्यास योग्य ठरते. कारण तो या सर्व घटकांचा विचार तुमच्या वतीने करतो.
आपल्या माहितीसाठी गुंतवणूकदारांचे विविध प्रकार नमूद करत आहोत. कारण आपण कुठल्या प्रकारात मोडतो; हे समजल्यास गुंतवणूक सल्ला समजून घेणे सोपे जाते.
प्रकार १ – कमीत कमी जोखीम पत्करून निश्चित परतावा (रिटर्न्स) देणाऱ्या गुंतवणूक योजनांची निवड करणारे.
उदाहरण – बँकेत मुदत ठेव योजनेत पैसे ठेवणारे.
प्रकार २ - थोड्या प्रमाणात जोखीम पत्करून सरकारी योजनांपेक्षा अधिक परताव्याची इच्छा करणारे.
उदाहरण- म्युच्युअल फंड योजनेत पैशाची गुंतवणूक करणारे.
प्रकार ३ - अधिक जोखीम पत्करून सर्वात अधिक संभाव्य परतावा मिळण्याची इच्छा करणारे.
उदाहरण- शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणारे.
ही अगदीच प्राथमिक आणि ढोबळ विभागणी होय. याविषयी अधिक स्पष्ट माहिती सांगायची तर त्या व्यक्तीशी चर्चा करूनच सांगता येते, कारण अनेक गोष्टी चर्चेतूनच लक्षात येतात.
(महत्त्वाची टीप - 'जोखीम' हा शब्द गुंतवणूक परतावा कमी-अधिक मिळण्याबाबतची शक्यता दर्शविण्यासाठी वापरला आहे. आपले कष्टाचे पैसे कधीही माहीत नसलेल्या गुंतवणूक योजनेत भरू नयेत.)