आज स्मार्ट गुंतवणूकदार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वतःची संपत्ती निर्माण करत आहे. त्यामध्ये सर्वात मोठं योगदान भारतीय शेअर बाजाराचे आहे. नामांकित कंपन्यांचे शेअर्स आणि इतर कर्जरोखे (बॉण्ड आणि डिबेंचर इत्यादी) ची खरेदी-विक्री ऑनलाईन पद्धतीने होते. आपल्याला ह्या गुंतवणूक संधीचा फायदा घ्यायचा असल्यास डिमॅट खाते अनिवार्य आहे.
सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) ने १९९६ साला पासून डिमॅट खाते पद्धत सुरू केली.
डिमटेरिअलायझेशन ह्या शब्दाला संक्षिप्त स्वरूपात 'डिमॅट' असे म्हणतात. मराठीत ह्याचा सोप्या शब्दात अर्थ असा की, शेअर बाजारातील कागदी स्वरूपातील व्यवहाराचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीत रूपांतर झाले. पूर्वी शेअर बाजारात प्रत्यक्ष व्यवहार होत असे. म्हणजेच शेअर सर्टिफिकेट, डिबेंचर सर्टिफिकेट, बॉण्ड्स इत्यादी चे व्यवहार शेअर बाजारात जाऊन करावे लागत असे. आज व्यवहारिक दृष्टीने प्रत्यक्ष (कागदी स्वरूपातील) व्यवहार अशक्य आहेत. ह्याची जाणीव तीन दशकांपूर्वी सेबी ला झाली होती. म्हणूनच डिजिटल प्रक्रियेची सुरुवात झाली.
आज शेअर बाजारातील सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. संगणक प्रणालीद्वारे सर्व ब्रोकर्स आणि त्यांचे गुंतवणूकदार शेअर बाजार सोबत जोडलेले आहेत.
आपल्याला डिमॅट खाते उघडायचे असल्यास सेबी ने अधिकृत केलेल्या कुठल्याही ब्रोकर कंपनी द्वारे आपण डिमॅट खाते ऑनलाईन देखील उघडू शकतो.
ऑनलाईन डिमॅट खाते उघडण्यासाठी खाली नमूद केलेली कागदपत्रे (माहिती) अपलोड करावी लागते.
१. पॅन कार्ड
२. पासपोर्ट आकाराचा फोटो
३. स्वतःच्या स्वाक्षरीची एक प्रत
४. ओळखीचा पुरावा - पॅन कार्ड
५. पत्त्याचा पुरावा - आधार कार्ड, मतदार ओळखपत्र,
पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वीज बिल
(यापैकी कोणतेही दस्तऐवज देता येते)
६. बँक खाते असल्याचा पुरावा म्हणून बँक पासबुक ची प्रत
७. रद्द केलेला चेक (चेक वर दोन समांतर तिरप्या रेघा मारून, त्यामध्ये कॅन्सल लिहावे)
(महत्वाची टीप - ऑफलाईन म्हणजेच सब-ब्रोकर च्या ऑफीस मध्ये जाऊन डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया करता येते. वर नमूद केलेल्या कागदपत्रांची प्रत सब-ब्रोकर च्या ऑफीस मध्ये जाऊन दिल्यास त्यांचे कर्मचारी डिमॅट खाते उघडून देण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.)
थोडक्यात, डिमॅट खाते हे गुंतवणूकदारासाठी अतिशय सुरक्षित इलेक्ट्रॉनिक खाते आहे. आपल्या व्यतिरिक्त ह्या खात्यातून कोणीही व्यवहार करू शकत नाही. आपण घेतलेले शेअर्स किंवा इतर कर्जरोखे पूर्णपणे सुरक्षित राहतात. त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक संपत्तीची तिजोरी म्हणजेच डिमॅट खाते लवकरात लवकर उघडावे.