शेअर्स / इक्विटी


pageheaderimg


शेअर बाजारातील गुंतवणूक

 

आजच्या काळात शालेय विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक या सर्वांना आकर्षित करणारा विषय म्हणजे 'शेअर बाजार'. गुंतवणूक विषय सुरू केल्यावर शेअर बाजार बद्दल बोलण्यास सुरू केल्यास उत्साहवर्धक वातावरण पहायला मिळते. 'शेअर बाजार' हे वाक्य जरी उच्चारले तरी सर्वांचे लक्ष केंद्रित करण्यास पुरेसे आहे. त्याची

कारणे सुध्दा विशेष आहेत. दरवर्षी उंचावत जाणारा सेंसेक्स आणि निफ्टी चा आलेख, कॉर्पोरेट जगतात मुरलेल्या कंपन्यांचे येणारे आयपीओ, शेअरधारकांना मिळणारा लाभांश, चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स मधील किंमतीत सातत्याने होणारी वाढ इत्यादी.

 

आपण बचत केलेला एक-एक पैसा महत्वाचा आहे. तो योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास संपत्ती निर्माण होते. हा भाव प्रत्येकाच्या मनात रुजणे महत्वाचे आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात शेअर बाजार संबंधित दहा-बारा संकल्पना पाहून संपत्ती निर्माण होत नाहीत. आपल्या घरगुती गप्पा करताना सुध्दा शब्द कानावर पडतात; जरा एक-दोन पावसाळे पाहिल्यावर सगळं हळूहळू समजायला लागेल. आपल्या शेअर बाजारातील एक पावसाळा म्हणजे कंपन्यांचे तिमाही अहवाल. ती टांगती तलवार कंपन्या आणि गुंतवणूकदार दोघांवर नेहमी असते. तीन महिन्यात कंपनीने नफा वाढवणारी कामे केली असल्यास शेअर चे भाव सुद्धा वाढायला लागतात.

 

शेअर बाजारात व्यवहार करताना बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळतात. डेटा मॅनेजमेंट मध्ये माहिती आणि मुख्यतः आकडे स्वरूपातील माहिती गोळा केली जाते. त्याचप्रमाणे  शेअर्स मधील गुंतवणूकीचे धडे गिरविताना स्वतःच्या डायरी मध्ये निवडक कंपनीच्या शेअर्सच्या किंमती लिहून ठेवल्या पाहिजेत. तशी सवय लावून घेतल्यास भविष्यात खूप फायदा होईल. कारण कालांतराने आपल्याला या आकड्यांची भाषा समजायला लागते. तेव्हा नुसते शेअर्सच्या किंमतीवर लक्ष केंद्रित न राहता; व्यक्तीची वृत्ती अभ्यासू होते.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे (लिस्टेड कंपन्यांचे) दर तिमाही अहवाल अभ्यासताना एक-एक कोडं सुटत जाते; आणि यशाची शिखरे सर करताना आपणच स्वतः कडे कुतूहलाने पाहतो. खरंच.. शेअर्स च्या किंमती आणि कंपन्यांच्या वार्षिक अहवालाच्या संख्या आपल्याशी बोलत आहेत; याचा अनुभव आपण स्वतः घेतो. हीच ती पहिली पायरी जेथे रोखे व्यवहारातून म्हणजेच पैसे देऊन शेअर्स विकत घेण्याच्या पद्धतीत व्यक्ती संपत्ती निर्माण करू लागतो.

 

भारतीय शेअर बाजारात आलेला प्रत्येक गुंतवणूकदार पैसे कमवतो असे ही नाही. ते ठरते गुंतवणूकदाराच्या मानसिकतेवर. पैशाच्या हव्यासापोटी शेअर बाजारात उतरलेल्या प्रत्येक व्यक्तीने पैसे गमावलेच आहेत. आपली मानसिकता मालमत्ता निर्माण करणारी असल्यास भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक पर्याय जगात शोधून सापडायचा नाही.

जागतिक स्तरावर गुंतवणूक विषयावर संशोधन करणाऱ्या अनेक दिग्गज संस्थाचे अहवाल सांगतात की, भारतीय व्यक्ती पैसे बचत करण्यात अग्रेसर असतो. पण गुंतवणूक करताना अनेकदा चूक करतो. कित्येक वेळा आपण शेअर बाजारातील गुंतवणूक ह्या विषयावरील कार्यक्रम पाहतो किंवा लेख वाचत असतो. पण नेमकी सुरुवात कुठून व कशी करावी हे लक्षात येत नाही. म्हणूनच शेअर्स मध्ये गुंतवणूक सुरू करताना खालील नमूद केलेल्या नियमांचे पालन कटाक्षाने करावे.

 

~ सेंसेक्स आणि निफ्टी मध्ये सहभाग घेणाऱ्या कंपनी चे शेअर्स घ्यावे.

~ सुरुवातीच्या काळात शेअर्स मधील गुंतवणूक बँक मधील मुदत ठेवी वरील मिळणाऱ्या व्याजाने करावी. कारण बाजारातील चढ-उतार पेलण्यासाठी दरमहा येणारी निश्चित रक्कम खूप महत्त्वाची असते.

~ दर महिन्यात किंवा तिमाहीत थोडे-थोडे करून शेअर्स घ्यावेत.

~ एकाचवेळी तीन पेक्षा अधिक कंपन्यांचे शेअर्स घेऊ नये.

~ शेअर बाजारात सलग एक-दोन आठवडे वाढ होत असल्यास आपल्या कडील १०%-२५% शेअर्स विकावेत. जेणेकरून मार्केट खाली आल्यावर त्याच कंपनीचे शेअर्स कमी भावात विकत घेता येतील.

~ इंट्रा-डे ट्रेडिंग करणे टाळावे. कारण त्यातून एकदा पैसे मिळाल्यास व्यक्ती जुगारी प्रवृत्तीकडे वळतो.

~ शेअर्स ही इलेक्ट्रॉनिक मालमत्ता आहे. तुम्हाला खंडाखंडाने शेअर्स घेऊन मालमत्ता निर्माण करायची आहे. हे कधीही विसरू नका.

 

वर नमूद केलेल्या नियमांचे पालन केल्यास आपल्याला शेअर्स द्वारे मालमत्ता निर्माण करण्यास कोणीही रोखू शकत नाही. शेअर बाजारातुन कमी वेळात भरपूर पैसे कमावण्याचे ध्येय डोळ्यासमोर असल्यास आर्थिक तोटा वाट्याला येण्याची शक्यता अधिक असते.

 

शेअर बाजाराला 'इक्विटी मार्केट' असे देखील संबोधतात. कारण कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्सची खरेदी-विक्री सतत होत असते. शेअर्सची मागणी आणि पुरवठा नुसार त्यांचे भाव सतत कमी-जास्त होत असतात. हा मुद्दा सकारात्मक दृष्टिने पाहिल्यास प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअर्स खरेदी आणि विक्रीची संधी मिळत असते. त्यामुळे शेअर्स ची खरेदी किंवा विक्री करताना कधीही घाई करू नये. ही विनंती समजावी. कारण तुमचा एक-एक पैसा मौल्यवान आहे. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदार स्वरूपात शेअर्सची खरेदी करत राहिल्यास भारतातील औद्योगिक प्रगतीसोबत तुम्ही देखील स्वतः ची मालमत्ता निर्माण करणार; ह्यात तीळमात्र शंका नाही.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen