मनातील पैसा आणि पैशांतील मन

25 Feb 2023;

postimage

तुम्हाला किती पैसे मिळतात,त्यातील किती पैशांची बचत करायची,कुठे किती गुंतवणूक करायची ,भविष्यात किती पैसे लागतील याचा तुम्ही विचार करता का? करत असाल तर अभिनंदन, करत नसाल तर असा विचार करायला सुरुवात करा. असा विचार करून कोणती कृती करायची याची माहिती तुम्हाला त्या विषयातील तज्ज्ञ येथे देत राहतील. मी त्या विषयातील तज्ञ नाही, परंतु मनातील भावना आणि विचार यांचा मात्र मी अभ्यासक आहे. मनातील भावना कशा निर्माण होतात, त्रासदायक भावना कशा बदलता येतात, भावनांचा आपल्या वागण्यावर कसा परिणाम होतो याची माहिती मी देऊ शकतो. पैसा,धन याविषयी देखील तुमच्या मनात ज्या भावना असतात त्यानुसार तुमचे वागणे होत असते. पैशांची बचत, गुंतवणूक, पैसे कोणत्या गोष्टींसाठी वापरायचे अशा अनेक गोष्टीविषयी प्रत्येकाच्या मनातील भावना वेगळी असू शकते, त्यानुसार प्रायोरिटी, प्राधान्य क्रम बदलतात. तुमचे व्यक्तिमत्व,संस्कार, तुमची आर्थिक धोका पत्करण्याची तयारी, तुम्ही भविष्याचा विचार कसा करता, आणि याविषयीच्या तुमच्या भावना कशा महत्वाच्या असतात याची चर्चा आपण येथे करणार आहोत.

भविष्याचा विचार अवश्य करायला हवा, त्यासाठी आवश्यक बचत आणि गुंतवणूक करायला हवी. पण एखादा माणूस सतत हाच विचार करत राहिला तर तो वर्तमान क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. असा आनंद घ्यायचा असेल तर विचार करणे आणि मनात आपोआप विचार येणे यातील फरक समजायला हवा. तुम्हाला हा फरक समजतो का? मन विचारात असते त्यावेळी तुम्ही विचार करत असतं किंवा मनात विचार येत असतात. पैशविषयी विचार करायला हवा पण त्याबद्दल आपोआप कोणते विचार मनात अधिक येत राहतात याबद्दल सजगता विकसित करायला हवी. ती कशी विकसित करायची याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

 

पैसे खर्च करून तुम्ही एखादा आनंददायी अनुभव विकत घेतला असेल पण त्यावेळी यासाठी इतका खर्च झाला आहे हाच विचार मनात येत राहिला आणि त्यावर तुम्ही विचार करत राहिलात तर खर्च केलेले पैसे वाया गेलेले असतात, कारण असे विचार असताना आनंद अनुभवता येत नाही. कारण भरकटणारे मन आनंदी नसते असे जगभरातील संशोधनात स्पष्ट झाले आहे. कोणताही सुखद अनुभव घेताना लक्ष वर्तमान क्षणात कसे ठेवायचे या विषयी आपण येथे चर्चा करू. मात्र केवळ चर्चा पुरेशी नाही, त्यानुसार तुम्ही लक्ष देण्याचा सरावही करायला हवा.

 

माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, किंवा मला आत्ता जसे पैसे मिळत आहेत तसे ते भविष्यात मिळत राहतील का, असे त्रासदायक विचार बहुसंख्य माणसांच्या मनात येत असतात. मग असे विचार येऊ नयेत म्हणून ड्रिंक, डान्स,सेक्स किंवा मन दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण सतत असे विचारांपासून पळून जाणे योग्य नसते, त्याचे अनेक दुष्परिणाम होत राहतात, मन दुसरीकडे वळवले तरी अबोध मनात ते विचार राहतात. त्यामुळे जाणीव होत नाही, जागृत मनाला समजत नाही असा मानसिक तणाव कायम राहतो. अशा तणावामुळे अनेक शारीरिक आजार होतात. ते कमी करायचे, टाळायचे असतील तर सतत व्यस्त न राहता काहीवेळ काहीही न करता शांत बसायचे. त्यावेळी अज्ञ  मनात जे काही आहे त्यानुसार जागृत मनात विचार येतात. या आपोआप येत राहणाऱ्या विचारांच्या आणि भावनांच्या लाटाना सामोरे जाण्याचे कौशल्य विकसित करता येते. हे कौशल्य कसे विकसित करायचे याची माहिती तुम्हाला येथे मिळत राहील.

थोड्या कालावधीत भरपूर पैसे मिळायला हवेत असा विचार बरेच जण करत असतात. अनेकांची आर्थिक फसवणूक याच विचाराला बळी पडून होत असते. असे फसवणूक करणारे एक मोहजाल निर्माण करतात त्यामुळे तार्किक विचार करणारा मेंदूचा भाग काही काळ कामच करत नाही. अशा वेळी भावनांची सजगता असेल तर हा लोभ टाळता येतो. एक वर्षात दुप्पट पैसे करून देणारी व्यक्ती खोटे दावे करते आहे, तिने काही वेळा असे पैसे दिले तरीही या व्यवहारात फसवणूक होऊ शकते हा विचार करणे, सजगता असेल तरच शक्य होते. अशी भावनांची सजगता कशी विकसित करायची हे आपण येथे पाहू.

    अशी फसवणूक होऊ शकते या विचाराने काही माणसे कुठेही गुंतवणूक करायलाच घाबरतात. काहीजण तर येणाऱ्या पैशांची बचत करणे सोडाच, न आलेला पैसा ही आधीच खर्च करून टाकतात. आज वापरा नंतर पैसे द्या अशा अनेक जाहिराती आपल्याला सतत दिसत असतात. खिशात पैसे नसले तरीही खूप शॉपिंग करता येते. अशी क्रेडिट कार्ड सतत वापरण्याची मानसिकता का निर्माण होते, त्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत, समृद्धी वाढवण्यासाठी अशी मानसिकता कशी धोकादायक असते, याचाही विचार आपण येथे करूया. शॉपिंग करणे हे देखील एक व्यसन आहे, ते केले नाही की अस्वस्थ वाटू लागते यामागे मेंदूतील काही रसायने कारणीभूत असतात, त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे देखील तुम्ही समजून घेऊ शकता.

माणसाचा मेंदू आळशी असतो, त्यामुळे तो फास्ट थिंकिंग करतो. त्यानुसार मनात येणाऱ्या विचारांचा प्रभाव माणसाच्या पूर्ण विचार प्रक्रियेवर राहतो. गुंतवणूक करताना कितीही तांत्रिक विश्लेषण केलेले असले तरीही निर्णय घेताना माणसे या फास्ट थिंकिंग नुसारच निर्णय घेतील अशी भीती असते. या विषयावर अनेक वर्षे संशोधन करून डॉ डनियल केनहमन यांनी ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्यासारखे अनेक जण ‘बिहेवियर इकॉनॉमी’ म्हणजे आर्थिक व्यवहारांची मानसिकता आणि वर्तन या नवीन विषयात काम करत आहेत. त्यांचे निष्कर्ष आपण येथे सोप्या भाषेत समजून घेऊ, त्यासाठी नियमितपणे येथे भेटत राहू.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen