नवीन वर्षात नवीन काय?

28 Mar 2023;

postimage

ये जो वर्ल्ड है ना वर्ल्ड, इसमे तीन तरीके के लोग होते है ! नाही नाही हा कोणत्याही बॉलिवूड सिनेमातील डायलॉग नाहीये, माझाच डायलॉग आहे.

 

शेअर मार्केटच्या अनुषंगाने बघायला गेलं तर खरंच अशी तीन प्रकारची माणसं असतात. पहिल्या वर्गातील लोकांचा या मार्केटशी अतिशय घनिष्ट संबंध असतो. त्यांचं जीवनच असतं म्हणा ना हे मार्केट.  दुसरा वर्ग म्हणजे ज्यांना या जगाची कल्पना आहे, त्यांचं त्यावर दुरून लक्षही आहे पण निरनिराळ्या कारणांनी ते त्यात सहभागी होत नाहीत किंवा होऊ शकत नाहीत. तिसऱ्या वर्गातील लोकांचा शेअर मार्केट वगैरेंशी काडीचा संबंध नसतो. म्हणजे त्यांच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम हे मार्केट करत असतंच, पण ते त्यांच्या गावीही नसते. म्हटलं तर हे सुखी लोक. . म्हणजे एखाद्या खेळाशी तुलना केली तर खेळाडू किंवा तत्सबंधी लोक, स्टेडियम मध्ये बसलेले किंवा बाहेरून जिथून शक्य आहे तिथून या खेळावर नजर ठेवून असलेले आणि तिसरे म्हणजे ज्यांना हा खेळ अस्तित्वात आहे याची कल्पनाच नाही असे. 

 

या तिसऱ्या वर्गाचं जाऊ देत, पण शेअर मार्केटच्या संदर्भात बाकी दोन वर्गाचं जग गेले वर्षभर  अगदी घटनाच सांगायची तर रशिया- युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून, फार म्हणजे फार डिस्टर्ब्  झालं आहे. 

युद्धामुळे पॉझ बटन दाबले गेलेले युरोप- अमेरिकेचे मार्केट, विशेषतः युरोप मध्ये युद्ध सावटामुळे मंदीसदृश परिस्थिती,  महागाईमुळे अमेरिकेत ‘फेड’ने वाढवलेले इंटरेस्ट रेट, त्यामुळे जेरीला आलेली अर्थ व्यवस्था आणि एका मागे एक गपागप मान टाकणाऱ्या परदेशी बँका. या सगळ्याचा परिणाम म्हणून जगभर कोसळणारे बाजार निर्देशांक. अशा म्हटलं तर भयाण पार्श्वभूमीवर, कासव जसं स्वतःला आपल्या कवचात ओढून घेतं तसं प्रत्येक जण,  प्रत्येक उद्योग, नवीन काही सोडा, आहे ते कसं राखता येईल याच्या, स्वतःला तगवण्याच्या चिंतेत आहे. आणि या अशा काळात आम्ही मात्र  ‘ध्यानीMoney.कॉम’ या आपल्या नवीन उपक्रमाला सुरुवात करीत आहोत. मार्केट म्हटलं तर अति व्यवहारवादी, भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे, हृदयशून्य वाटत असले तरी एका वेगळ्या अँगलने पाहिलं तर एकदम अध्यात्मिक वाटेल. 'This too shall pass ' किंवा 'स्थिती ही प्रकृती नाही. जे वर गेलंय ते कधीतरी खाली येणारच, जे खाली गेलंय ते वर येणारच'' हे तत्वज्ञान मार्केटला देखील तितकंच लागू पडतं, नाही का? असं म्हणतात की लांबचा प्रवास करायचा असेल तर दोन्हीकडे नजर ठेवावी लागते. पायाखाली काय आहे, म्हणजे वर्तमानात काय चाललंय हे जितकं महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं आपली आपल्या ध्येयावरची नजर, म्हणजे भविष्याचा विचार. वर्तमानात राहून सतत भविष्याचा वेध घेत आपली वाटचाल सुरु राहायला हवी. हेच ध्यानात ठेवून आम्ही 'मनी' म्हणजे पैशांच्या गोष्टी मराठी भाषेतून करणारं 'ध्यानीमनी डॉट कॉम' (dhyanimoney.com)  हे अस्सल मराठी निःशूल्क पोर्टल आपल्यासमोर सादर करीत आहोत. 

मराठी माणूस पैशांचा फार विचार करत नाही. म्हणजे त्याला पैशांचं महत्व नसतं असं नाही. पण पैसा हे सर्वस्व नाही, भौतिक जगातील विनिमयाचे ते एक साधन आहे ही त्याची फिलॉसॉफी असते. पण जग मात्र रोकड्या व्यवहाराचं आहे. गरजेच्या वेळी गाठीला असणारा पैसाच मदतीला येतो हे सत्य कधी ना कधी त्याला वास्तवाचं दर्शन देऊन जातं आणि ते काही फार काही सुखावह नसतं. मनं दुरावतात, नाती तुटतात. गेलेली वेळ, माणसं परत येत नाहीत ते वेगळंच. हे सगळं टळू शकतं. फार काही नाही, पैशाशी असलेलं मराठी माणसाचं नातं फक्त फिक्स करायला पाहिजे, म्हणजे त्यात सुधारणा करायला पाहिजे. ते करण्यासाठीच ‘ध्यानीमनी डॉट कॉम’ चा जन्म झाला आहे. 

 

साईटवर काय काय आहे? तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या मूलभूत संकल्पना मांडण्यापासून रोजच्या महत्वाच्या,  दखल घ्याव्याश्या आर्थिक आघाडीवरील बातम्या येथे आहेत. शिवाय जरा हटके पण आर्थिक विषयांवर आधारित असे लेख पण आहेत. म्हणजे काही स्टॅटिक आणि काही डायनॅमिक असं कन्टेन्टचं एक मिक्श्चर आहे. साईटची भाषा मुद्दाम मिंग्लिश ठेवली आहे. कठीण मराठी भाषेतून आर्थिक संकल्पना मांडायच्या ऐवजी  सोप्या सहज समजेल अशा भाषेतून मराठी माणसाला आर्थिक संकल्पनांशी ओळख करून द्यायची आणि अर्थ विश्वात फिरवून आणायचं आम्ही ठरवलं आहे. इथे मराठी भाषेवर आपल्याला काम करायचं नाहीये ( त्यासाठी बहुविध डॉट कॉम आहेच ) तर मराठी मनांवर काम करायचं आहे याची आम्हाला पक्की जाणीव आहे. 


 

साईट सध्या अगदीच बाल्यावस्थेत आहे किंवा अर्भकावस्थेत आहे असं पण म्हणू शकता. कारण मेन डोमेन वर साईट शिफ्ट करून  जेमतेम ५ दिवस झाले आहेत.  त्यामुळे बघितली की बऱ्याच सुधारणा सांगाव्याश्या वाटतील. त्या जरूर सांगा, सुचवा. बाल्यावस्थेत असण्याचा एक फायदा असतो, म्हणाल ते बदल त्यात होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, या साईटला नक्की भेट द्या. जे मनात येईल ते 'आम्हाला काय वाटेल' याचा अजिबात विचार न करता कळवा. साईटवरच whatsapp चं बटन आहे. त्यावर तुमचे अभिप्राय कळवू शकता. आम्ही आपल्या प्रतिसादाची अपेक्षा करतोय...

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen