संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून मराठी माणसासाठी; पर्यायाने मराठी राजकारणासाठी; स्पर्धक नंबर एक हा गुजरात आणि गुजराती समाजच आहे. जिथे व्यवसाय आहे तिथे गुजराती, पंजाबी, सिंधी समाज आणि नोकऱ्यांमध्ये दाक्षिणात्य समाज आपल्यावर कायम वर्चस्व गाजवत आलाय. हे असं का होत असेल? आणि आपण या समाजांच्या कडून कोणत्या गोष्टी शिकू शकतो की ज्यामुळे त्यांना हे शक्य होत असेल? यावर खोल चिंतन होणं आवश्यक आहे.
फोक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गुजरातकडे गेला आणि एकच गदारोळ उठला. त्यात राजकीय आरोप प्रत्यारोप होतेच, पण ते तेवढ्यावरच थांबलं नाही. समाजमाध्यमांवर आणि अगदी घराघरातदेखील 'हे असं का झालं असेल?' याच्या चर्चा झाल्या. सगळीकडे साधारण एकच सूर होता, ‘महाराष्ट्र कमी पडला, गुजरात जिंकला.’ राज्यपालांनीही मध्ये एक विधान करुन खळबळ उडवून दिली होती की गुजराती/मारवाडी समाजामुळेच महाराष्ट्रात सुबत्ता आहे. त्यावरही तावातावाने चर्चा झाल्या. पण सहज आजूबाजूला नजर टाकली तर हेच सत्य आपल्यालाही दिसतं. याबद्दलचा एक अनुभव सांगण्यासारखा आहे. यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशीच नेमका जैन समाजाचा पर्युषण नावाचा सण होता. आम्ही ठाण्याला गोखले रोड, राम मारुती रोड ( हे ठाण्याचे मुख्य रस्ते ) येथे सहज फेरफटका मारत होतो. लक्षात आलं की जवळपास सगळी दुकानं बंद आहेत. सुरुवातीला आम्हाला वाटलं की गणेश चतुर्थीमुळे बंद असतील. पण जरा जास्तच दुकानं बंद आहेत असं दिसल्यावर आम्ही अधिक निरखून पाहिलं तर दुकानांच्या बंद शटर्स वर 'पर्युषणामुळे दुकान बंद' असल्याचं लिहिलेलं होतं. म्हणजे बघा, ठाण्यासारख्या मराठीचा तथाकथीत वरचष्मा असलेल्या शहरातही मुख्य रस्त्यावरील बहुतांशी दुकानं जैन समाजाची आहेत. इतर भाषिक समाज हा मराठीच्या तुलनेत अधिक धनिक असल्याचा अजून काय पुरावा हवा?
मध्ये मी financial express ने घेतलेल्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. पुरस्कार मिळवणाऱ्यात, एवढंच काय पुरस्कार देणाऱ्यातदेखील कोणीही मराठी नव्हतं. तुम्ही एक गंमत म्हणून पुढच्या वेळी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलच्या रेस्टारेंट्मध्ये गेल्यावर सहज निरीक्षण करा. जे मोठे ग्रुप्स तिथे असतात त्यात मराठी माणूस सापडण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे आपण नुसते कमावण्याच्याच नाही तर खर्च करण्याच्या बाबतीत देखील खूपच पिछाडीवर आहोत.
दोन वर्षांपूर्वी करोनामुळे आमच्या ‘मेतकुट’, आणि ‘काठ न् घाट’ या रेस्टॉरंट्स च्या व्यवसायाचं कंबरड साफ मोडलं होतं. आर्थिक मदत तीही शक्यतो मराठी माणसांकडून हवी होती. त्यावेळी आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्राचा धांडोळा आम्ही घेतला. Angel investors , Venture capitalist, निरनिराळ्या स्टार्टअप फंडिंग एजन्सीज सगळीकडे फिरलो. तिथेही मराठी नावं अपवादानेच दिसली.
माझ्यापरीने मी विचार केला आणि एकंदर असं लक्षात आलं की मराठी समाज आणि पैसा/अर्थ यांच्या नात्यात फार सख्य नाही, उलट एक तुच्छतेची भावनाच आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैशाने सगळं विकत घेता येत नाही, पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी परवडली, सोने नाणे आम्हा मृत्तिकेसमान वगैरे वगैरे वचनं आपल्या समाजाची ब्रीदवाक्यच झाली आहेत. ‘दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू कोणती असेल तर ती आहे गिऱ्हाईक’ हे पुलंचं निरीक्षण आपल्याबद्दल बरंच काही सांगून जातं.
अर्थात ही आपली मानसिकता काही एका रात्रीत बनलेली नाही. आपला भवताल, पिढ्यानपिढ्याचे संस्कार, कदाचित आपले जीन्स याला कारणीभूत असतील. हे लक्षात आल्यावर म्हटलं, चला जग बदलायची सुरुवात स्वतःपासून करूया. गेली पंचवीस वर्ष कोट्यावधींचे उलाढाल असलेले व्यवसाय बांधण्यातून विविध अनुभव आले. त्यानंतर गेलं वर्षभर मी अर्थक्षेत्रातलं सर्व काही जाणून घेण्याच्या भावनेतून बराच अभ्यास केला, वाचन केलं. त्यातून जे काही आकळलं, ते इतर मराठी भाषिकांसोबत शेअर करावं या भावनेतूनच ‘ध्यानीmoney डॉट कॉम’चा जन्म झाला. मराठी-इंग्रजी संकराच्या या नावातूनच आपल्याला कळेल मला अभिप्रेत काय आहे ते. ध्यानीmoney डॉट कॉम हा मराठी माणसाच्या ध्यानात ‘money’चे महत्व ठसवण्याचा प्रयत्न आहे. पैशाचा हव्यास नको, पण ध्यास नक्की हवा, ही भावना यामागे आहे. पैशाने सगळं काही विकत घेता येत नाही, पण ‘बरंच काही’ विकत घेताही येतं, हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. ‘पैसा हेच सर्वस्व नाही हे खरं आहे, पण असं म्हणण्याआधी तुम्ही तो चिक्कार कमावलेला आहे याची खात्री करा’ या अर्थाचं एक इंग्रजी वाक्य आहे. पं. नेहरू म्हणायचे तसं बलवानांच्या अहिंसेला किंमत असते. पाश्चिमात्यांच्या भौतिकाच्या प्रेमाची आपण कायम कुचेष्टा करतो, पण आपण त्याचं दुसरं टोक गाठतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण सुवर्णमध्य साधायला हवा. म्हणूनच विद्येची देवता असणारा श्री गणपती आणि अर्थिक सुबत्तेचे प्रतिक असलेल्या लक्ष्मीची आपण दिवाळीच्या वेळी एकत्र पूजा करतो. विद्वत्ता आणि सधनता एकत्र नांदली पाहिजे हे आपल्याला कळते परंतु वळत नाही. ‘ध्यानीmoney डॉट कॉम’नं तुम्हाला त्याकडे वळवण्याचा वसा घेतलेला आहे. चला, श्रीमंत होऊ, चला अधिक पैसा मिळवू...जाणतेपणी.
चला, अधिक पैसा मिळवू...जाणतेपणी.
13 Mar 2023;